कृष्णात पाटील, मुंबई : ती अवघ्या नऊ महिन्यांची असताना तिनं जीवन-मरणाची लढाई जिंकलीय. सायन हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. तब्बल सात तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या पोटातून तीन किलोचा ट्युमर काढण्यात आला... आणि तिला जीवनदान मिळालं.


जन्मत:च बाळाला आजार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशातील आझमगडजवळच्या एका खेडेगावातून आलेल्या दुर्गावती यादव यांच्या मुलीला जन्मत:च पोटात गाठ होती. ती गाठ दिवसेंदिवस वाढू लागल्यानंतर मुलीच्या पोटाचा आकारही वाढू लागला आणि मागील एक बाजूही वाढू लागली. दोन महिन्यांपूर्वी या मुलीला सायन रूग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व टेस्ट करण्यात आल्या. पोटात वाढ असलेल्या गाठीनं किडनी, लिव्हर, आतड्यांना एका बाजूला सारल्यानं हे अवयव दाबले गेले होते. 


सात तासांची शस्त्रक्रिया 


पण डॉ. पारस कोठारी यांनी आणि त्यांच्या टीमनं सलग सात तास शस्त्रक्रिया करून हा गुंता सोडवला आणि तीन किलो वजनाचा ट्यूमर बाहेर काढला. या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना २०० टाके घालावे लागले.


सोनोग्राफीमुळे वेळीच उपचार शक्य 


जन्माला येणाऱ्या ५० हजार बाळांमागे एका बाळाला अशा प्रकारची गाठ जन्मत:च येऊ शकते. गरोदरपणाच्या काळात सोनोग्राफी केल्यास ही गाठ लक्षात येते. यामुळं बाळ लहान असतानाच शस्त्रक्रिया केल्यास छोटी गाठ काढता येते. यामुळं पुढं जावून गुंतागुंत वाढत नाही.


या ९ महिन्याच्या मुलीचे वजन होते ९ किलो, त्यात ३ किलोचा ट्यूमर... यामुळं खूप तिला खूप त्रास होत असे. परंतु आता शस्त्रक्रियेनंतर ती तिचं नॉर्मल आयूष्य जगू शकते.