मुंबई : शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीचा मुहूर्त साधत शनिवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्घाटनाच्या या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार अनिल परब, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आदि मान्यवर उपस्थित होते. शेकडो शिवसैनिकांनी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.


खरं तर हा पुतळा केव्हाच तयार झाला होता. पण, काही शिवप्रेमींच्या म्हणण्यानुसार, विमानतळाची जबाबदारी सांभाळणाऱ्या 'जीव्हीके' या कंपनीच्या आडमुठेपणामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकलं नव्हतं.


शिवसेनेच्या काही नेत्यांनी या विरोधात आवाज उठवला होता. इतकंच नाही, तर काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी या ठिकाणी जमा होऊन प्लास्टिकमध्ये झाकून ठेवलेल्या या पुतळ्याचे स्वहस्ते अनावरण करण्याचाही घाट घातला. आज अखेर या पुतळ्याचे औपचारिक उद्घाटन पार पडलंय.