मुंबईवरच्या वर्चस्वासाठी ठाकरे बंधुंनी कसली कंबर
मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे.
मुंबई : मुंबईवर असलेलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधुनी कंबर कसली आहे. महापालिका निवडणुकांना अजून चार महिने शिल्लक आहेत. मात्र आता मुंबई भाजपच्या हातात जाऊ नये यासाठी ठाकरे बंधू रस्त्यावर उतरलेत.
मुंबई गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरेंच्या ताब्यात आहे. पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं ही पकड थोडी सैल केली. विधानसभा निवडणुकीत ती आणखी ढिली झाली. खासदार, आमदार आणि राजकीय व्होट बँकेचा विचार करता. आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई ठाकरेंच्या हातातून पुरती निसटणार की काय अशी चिन्हं आहेत. त्यामुळेच ठाकरे बंधू आपापल्या पक्षाचा खुंटा हलवून बळकट करण्याच्या प्रयत्नात आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या शाखाशाखांना भेटी देणं सुरू केलं.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या रविवारी दहिसरमधून शाखांच्या दौ-यांचा शुभारंभ केला. सोमवारी ते कुलाबा ते ताडदेवमधल्या शाखांमध्ये पोहोचले. तर राज ठाकरेंनी सोमवारी वरळी आणि भायखळ्यात पक्षाच्या गडांना भेटी दिल्या. नेत्यांच्या या भेटीमुळे कार्यकर्ता पुन्हा जोमानं कामाला लागलाय.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनंही मिशन 227 सुरू केलंय. मुंबई काबीज करण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे डावपेच आहेत. सगळ्यात राजकीय पक्षांमधले धुरिणी कामाला लागलेत. या महापालिका निवडणुकीत युती-आघाड्यांची नवी समीकरणंही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई ही सोन्याची खाण आहे. तिच्यासाठीच्या लढाईत कुणीच गाफील राहणार नाही.