मुंबई : आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'झी 24 तास'ला दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या क्लिपमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या १३ व्या मजल्यावर भुजबळ फिरताना दिसतायत. छगन भुजबळ हे आरामात राहतायत. त्यांना अनेक राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी भेटायला येतात, असा अंजली दमानियांचा आरोप आहे.


जे जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या आशिर्वादाने उपचारांच्या बहाण्यानं भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधल्या कैदी वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलं, असाही दमानिया यांचा आरोप आहे. 


बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीकरता भरती झाले होते. त्यानतंर २ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर इतके दिवस छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिले होते.


छगन भुजबळांना जे जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवताना कोर्टाला किंवा जेल अधिक्षकांना कळविण्यात आलं होतं का? असा सवाल कोर्टाने केला होता त्यावर जेजे हॉस्पीटलचे डीन तात्याराव लहाने यांनी कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडलं होतं. 


त्यावर अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांची जेलमध्ये रवानगी करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान मुंबईतल्या विशेष इडी न्यायालयाने छगन भुजबळांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भुजबळ आता पुन्हा आर्थर रोड जेलची हवा खात आहेत.