मुंबई : मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं. संध्याकाळपासून अवघ्या 24 पूर्णांक 25 मिलीमीटर पावसानं मुंबईचे हे हाल केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातच पाणी उपसणारा एक पंप बंद पडल्यानं पाण्याचा निचरा होण्यातही अचडणी येत होत्या. पहिल्याच पावसानं मुंबई महापालिकेचे नालेसफाईचे सर्व दावे फोल ठरवले. पहिल्याच पावसात ही स्थिती आहे, तर पुढले 3-4 महिने आपलं काय होणार याची चिंता आता मुंबईकरांना भेडसावते आहे. 


गेल्या वर्षी नेमक्या याच तारखेला मुंबईच्या अनेक भागात पाणी साचलं होतं. मात्र तेव्हा मान्सूनचं मुंबईत आगमन झालं होतं. यंदा मात्र अधिकृतरित्या मान्सून मुंबापुरीत दाखल झाला नसतानाच ही अवस्था झाली आहे. आजची स्थिती गेल्या वर्षीइतकी भयानक नसली, तरी योगायोगानं एकाच तारखेला झालेल्या मुंबईच्या कोंडीमुळे वर्ष झालं, दावे झाले तरीही मुंबईकरांची या समस्येतून सुटका झाली नसल्याचंच अधोरेखित झालं आहे.