भाजपने सत्ता स्थापन केल्यास महापौर कोण?
भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.
मुंबई : भाजपने सत्ता स्थापन केल्यास तिथेही शिवसेनेला तोडीस तोड नगरसेवक महापौर आणि विविध पदावर द्यावे लागतील.
यात महापौर पदासाठी मनोज कोटक, डॉ. राम बरोट या अनुभवी नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. गुजराती महापौर दिल्यास भाजपला मोठ्या रोषाला सामोरे जावं लागू शकते.
शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रभाकर शिंदे यांच्या नावाला पक्षातूनच विरोध होऊ शकतो. त्यात उपमहापौर पदाचा अनुभव असलेल्या अनुभवी ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर हा महिला चेहरा भाजपकडे उपलब्ध आहे.
अशावेळी अनुभवी मनोज कोटक यांच्याकडे स्थायी समितीच्या चाव्या येऊ शकतात. तर सभागृह नेता या पदाचा अनुभव असलेले प्रभाकर शिंदेच्या गळ्यात त्या पदाची माळ पडू शकते.
स्थायी समितीच्या स्पर्धेत अनुभवी अतुल शहा यांचे नावही घेतले जातेय.
समजा भाजपला विरोधी पक्षात बसण्याची स्थिती निर्माण झाल्यास ऐके काळी शिवसैनिक राहिलेल्या आणि शिवसेनेची अंडीपिल्ली माहीत असलेल्या प्रभाकर शिंदे यांचा त्यांच्या आधीच्या पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. किंवा महापौर वा स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर वर्णी न लागलेले अनुभवी चेहरे या पदासाठी तयार असतीलच.