मुंबई : सांगलीतल्या म्हैसाळमध्ये स्त्री भ्रूण हत्येचं तांडव उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली... यासाठी, स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात बीग बी मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्त्रीभ्रूण हत्याविरोधी मोहिमेसाठी ब्रँड ॲम्बेसिडर होण्यासाठी बीग बी अमिताभ बच्चन यांना विनंती करणार असल्याचं आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटलंय. 
 
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. यासाठी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार भारती लव्हेकर यादेखील उपस्थित होत्या.  


स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सर्वात अगोदर समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. यासाठी जाणीव जागृतीसाठी बीग बी अमिताभ बच्चन यांची मदत घेण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन हे सध्या राज्य शासनाच्या वनविभाग तसंच क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून जाहिरातींत दिसतात. 


या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अधिक...


राज्यात मुलींचा सर्वाधिक जन्मदर हा भंडारा जिल्ह्याचा आहे, ही दिलासादायक बाब आहे. भंडाऱ्यात 2015 च्या तुलनेत 78 अंकांनी मुलींचा जन्मदर वाढला आहे 


परंतु, वाशिम जिल्ह्यात मात्र चिंताजनक परिस्थिती आहे. वाशिममध्ये मुलींचा जन्मदर सर्वात कमी असल्याची नोंद करण्यात आलीय.  


महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत अन्य राज्यांचे जिल्हे आहेत त्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जाते आणि महाराष्ट्रात येऊन गर्भपात केला जातो. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने कर्नाटक, गुजरात यासारख्या राज्यांना पत्र लिहून आवश्यक ती उपाययोजना करण्याची विनंती केली आहे, असं आरोग्य मंत्र्यांनी यावेळी म्हटलंय. 


गर्भलिंग चाचणीस महिलेस प्रवृत्त करणाऱ्या व तिच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तिला पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 23(3) नुसार शिक्षेची तरतूद आहे.