मुंबई : क्षुल्लक कारणावरून एका 26 वर्षांच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. ही घटना आहे मुंबईतल्या विक्रोळीमधील. चेतन आचिर्णेकर या 26 वर्षांचा पदवीधर तरूण आयुष्यातल्या पहिल्या हवाई सफरीचा आनंद घेऊन गोव्यातून मुंबईत परतला. विमानतळावरून विक्रोळीला घरी जाण्यासाठी त्यानं रिक्षा केली. रिक्षाचं बिल झालं 172 रुपये. 


चेतन आचिर्णेकर

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिक्षाचालकाकडं 500 रुपये सुट्टे नसल्यामुळं त्यानं वडिलांकडून 200 रुपये आणून रिक्षाचालकाला दिले. रिक्षाचालकानं 28 रुपये परत देण्याऐवजी 20 रुपयेच परत केले. सुट्टे 2 रुपये दिल्यावर 10 रुपये देईन, असं चेतनला सांगितलं. यावरून दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद ऐकून चेतनचे वडिल खाली आले आणि त्याला घरी चलण्याचा सल्ला दिला. मात्र रिक्षावाल्यानं जाता जाता चेतनला शिवी दिली. याचा राग येऊन चेतननं रिक्षाचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पकडल्यानंतर रिक्षा उलटली आणि चेतनच्या डोक्याला जबर मार लागला. 


चेतनला विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. एक मुजोर रिक्षाचालकामुळं केवळ दोन रुपयांसाठी एका बापाला आपल्या तरुण मुलाला गमवावं लागलंय. सुट्टे पैसे नसताना प्रवासी जर आठ रुपये सोडू शकतात, तर रिक्षाचालक दोन रुपये का सोडू शकत नाहीत, असा प्रश्नही विचारला जातोय. अतिशय क्षुल्लक कारणासाठी एका तरुणाचा जीव गेल्यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होतेय.