ताडोबाची सफर ठरणार आणखी संस्मरणीय
जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय ठरणार आहे.
चंद्रपूर: जगविख्यात ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची सफर आता अधिक संस्मरणीय ठरणार आहे. निळ्याशार इरई धरणाच्या पाण्यात पर्यटकांसाठी बोटिंग सुविधेचा प्रारंभ होणार आहे.
मार्चपासून या बोटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे ताडोबामध्ये वाघांच्या फोटोग्राफीबरोबरच आता तुम्हाला धरणक्षेत्रातल्या वेगवेगळ्या पक्षांचेही फोटो काढणं शक्य होणार आहे.
इरई धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात ही बोटिंग सुविधा सुरु केली जाणार आहे. देशातील याचटिंग असोसिएशन ऑफ इंडिया या बोटिंग क्रीडा प्रकाराशी संलग्न सर्वोच्च संस्थेने यासाठी सहकार्य दिले आहे.
एकूण २० गाईड यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहेत. तर १० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय एका बचाव पथकाला आकस्मिक प्रसंगांसाठी सज्ज करण्यात आले आहे.
सुमारे ६० लाख रू. खर्चून ३ बोटींची व्यवस्था करण्यात आली असून या बोटी गो ग्रीन असणार आहेत. सीतारामपेठ गावाजवळ यासाठी खास जेट्टी तयार करणात आली आहे. या बोटींमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली गेली असून लाईफ जॅकेट्स आणि जीपीएस ट्रॅकर आणि धरणाच्या पाण्यात मार्कर्स लावले जाणार आहेत.