मलेशिया : सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा ५-१ असा धुव्वा उडवत तिसऱ्या विजयाची नोंद केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या सत्रातील चौथ्याच मिनिटाला भारताच्या मनप्रीत सिंगने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुढील तीन मिनिटांतच पाकिस्तानकडून गोल झाल्याने १-१ अशी बरोबरी साधली गेली. 


मात्र ही बरोबरी जास्त काळ टिकू शकली नाही. १०व्या मिनिटाला मनप्रीतच्या पासवर एसव्ही सुनिलने भारताच्या खात्यात आणखी एका गोलची भर टाकली आणि आघाडी वाढवली. दुसऱ्या सत्रात एकाही संघाला गोल करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या सत्रात ४१ व्या मिनिटाला एस.व्ही. सुनिलने आणखी एक गोल केला आणि आघाडी आणखी वाढवली. चौथ्या सत्रात ५० आणि ५४व्या मिनिटाला भारताच्या हॉकीपटूंनी गोल करत पाकिस्तानवर ५-१ असा विजय मिळवला.