मुंबई : बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल जिंकत सिंधूनं इतिहास घडवला. ऑलिम्पिक मेडल पटकावून देणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली. याआधी कर्णम मल्लेश्वर, सायना नेहवाल, मेरी कोम आणि 2016 रिओ मध्ये कुस्तीपटू साक्षी मलिकनं असा कारनामा केला. 


भारताच्या ५ ऑलिम्पिक स्टार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१.  कर्णम मल्लेश्वरी : सिडनी ऑलिम्पिक- 2000 - वेटलिफ्टिंग 


कर्णम मल्लेश्वरी या भारताच्या अव्वल वेटलिफ्टरने ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिलं-वहिलं मेडल पटकावून दिलं. ब्राँझ मेडल जिंकत तिनं इतिहास रचला होता. तिनं स्नॅचमध्ये 110 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 130 किलो वजन उचलत ब्राँझ मेडलवर आपलं नाव कोरलं होतं. 


२. सायना नेहवाल : लंडन ऑलिम्पिक-२०१२ - बॅटमिंटन


कर्णर्ण मल्लेशवरीनं मेडल जिंकल्यानंतर तब्बल एक तपानंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यात यश आलं. शटलर क्वीन सायना नेहवाल ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी दुसरी भारतीय महिला ठरली. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ जिंकण्याची किमया तिनं साधली. बॅडमिंटनमधलं हे भारताचं पहिलं मेडल होतं. 


३. मेरी कोम : लंडन ऑलिम्पिक-२०१२ - बॉक्सिंग


२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमनं बॉक्सिंग रिंगमध्ये आपली जादू दाखवली. तिनं नॉकआऊट पंच देत ब्राँझ मेडल पटकावलं. ५१ किलोवजनीगटात तिनं ब्राँझ जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. ऑलिम्पिकपूर्वीच तिनं सा-यांचच लक्ष वेधून घेतलं होतं. ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होणारी ती पहिली महिला बॉक्सर होती. खडतर प्रवास करत तिनं ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली होती. मेरीनं आपल्या चाहत्यांना ब्राँझ मेडलचं गिफ्ट देत सेलिब्रेशनची संधी दिली.


४. साक्षी मलिक : रिओ ऑलिम्पिक-२०१६ - कुस्ती


हरियाणच्या रोहतक जिल्ह्यातून येणा-या साक्षी मलिकनंही महिलांमध्ये कुस्तीत भारतासाठी पहिलं मेडल पटकावलं. कायमच गीता फोगटच्या छायेत राहणा-या साक्षीनं ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ मेडल जिंकून दिलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये रिपेचाजमुळे साक्षीला संधी मिळाली. आणि ही संधी न दवडता तिनं पोडियम फिनीश करत भारताची मान अभिमानानं उंचावली. हरियाणात मुलींना कुस्ती खेळण्यापासून रोखणा-यांचा विरोध झुगारुन तिनं ऑलिम्पिक मेडल जिंकलं. त्यामुळे साक्षीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.


५. पी.व्ही.सिंधू : रिओ ऑलिम्पिक- २०१६ - बॅटमिंटन


ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला अॅथलिट्सना सिल्व्हर आणि गोल्ड मेडलनं हुलकावणी दिली होती. 2016 मध्ये सिल्व्हर मेडलचा दुष्काळ संपवण्याचं काम केलं ते बॅटमिंटनस्टार पी.व्ही सिंधूनं. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनची फायनल गाठत सिंधूनं गोल्ड मेडलचं स्वप्न सव्वाशे कोटी भारतीयांना दाखवलं. मात्र, तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानाव लागलं. भारतीय महिलांचं हे ऑलिम्पिकमधील पहिलं सिल्व्हर मेडल ठरलं. बॅडमिंटन कोर्टवर तिनं आपलं वेगळ स्थान निर्माण करत चीनी आव्हान मोडित काढलं. मात्र, तिचं गोल्ड मेडलचं स्वप्न अपूर्ण राहिलं. असं असलं तरी भारताच्या या पंचकन्यांनी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा हा डौलानं फडकवला.