उंचावली महाराष्ट्राची शान, सरकारी नोकरीचा बहुमान!
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
मुंबई : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करून राज्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या आठ खेळाडूंना शासकीय सेवेत सामावून घेतले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी प्रस्तावाल मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या खेळाडूंची निवड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
त्यानंतर या समितीने आठ खेळाडूंना शैक्षणिक व क्रीडाविषयक पात्रतेनुसार शासकीय सेवेत थेट सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
या प्रस्तावानुसार पुढील खेळाडूंना कोणत्या शासकीय सेवेत सामावून घेतलं जाणार आहे...
धावपटू कविता राऊत - आदिवासी विकास विभाग
कुस्तीपटू संदीप यादव - क्रीडा मार्गदर्शक
तलवारबाज अजिंक्य दुधारे - क्रीडा मार्गदर्शक
तिरंदाज नीतू इंगोले - क्रीडा मार्गदर्शक
वेटलिफ्टर ओंकार ओतारी - तहसिलदार
कबड्डीपटू नितीन मदने - तहसीलदार
नेमबाज पूजा घाटकर – विक्रीकर निरीक्षक
कबड्डीपटू किशोरी शिंदे - नगर विकास विभाग