अॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड
वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.
काल १४७ या धावसंख्येवर ३ विकेट पडले असतांना आज कांगारुंनी डाव सांभाळला. ख्वाजाने शतक पूर्ण करत त्याने १४० रनवर विकेट गमावली. यानंतर व्होग्स एका बाजुने भक्कमपणे उभा राहिला. त्याला पीटर नेव्हील आणि सिडल यांनी मोलाची साथ दिली. व्होग्सचे हे पाचवे कसोटी शतक आहे.
व्होग्सच्या खेळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तो ५०० पेक्षा जास्त धावा काढुनही अद्याप नाबाद आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावे हा विक्रम होता. सचिनने दोन डावांमध्ये ४९७ धावा काढल्या होत्या.