मुंबई: यंदाच्या टी 20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेला ऑस्ट्रेलियाच्या संघाला ही स्पर्धा जिंकण्यासाठी तशी फारशी कोणी पसंती देणार नाही. कारण जगज्जेत्या असलेल्या या टीमला आत्तापर्यंत झालेल्या 5 टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकदाही बाजी मारता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियानं आत्तापर्यंत तब्बल 5 वेळा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 2006 साली भारतात झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी ऑस्ट्रेलियानं जिंकली. स्टीव्ह वॉ आणि रिकी पॉईंटिंग या दोन्ही कॅप्टनच्या नेतृत्त्वामध्ये ऑस्ट्रेलिया टेस्ट क्रिकेटमध्येही नंबर एकवर राहिली.


पण टी 20 वर्ल्ड कपमध्ये मात्र ऑस्ट्रेलियाचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. टी 20 वर्ल्ड कपमधली ऑस्ट्रेलियाची सर्वोत्तम कामगिरी झाली ती 2010 साली वेस्ट इंडिजमध्ये. या वर्ल्ड कपमध्ये कांगारु फायनलमध्ये पोहोचले, पण इंग्लंडनं त्यांना धूळ चारली. 


हा इतिहास बदलण्याची आता ऑस्ट्रेलियाला नामी संधी चालून आली आहे. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, शेन वॉटसन यांच्यासारखे टी 20 क्रिकेटमधले तगडे खेळाडू ऑस्ट्रेलियाकडे आहेत, जे एकहाती मॅच फिरवू शकतात. 


टेस्ट क्रिकेटमधली नंबर 1 चा ताज, 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय. ऑस्ट्रेलियाच्या सध्याच्या टीममध्ये हा सुवर्ण काळ बघितलेला एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे शेन वॉटसन. पण टी 20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीनं नेहमीच वॉटसनला हुलकावणी दिली.


या टी 20 वर्ल्ड कपनंतर वॉटसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. त्यामुळे वॉटसनचा शेवट गोड करण्यासाठी आणि अधुरं राहिलेलं टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलिया जीवाचं रान करेल हे मात्र नक्की.