बीसीसीआयला उशीरा सुचलं शहाणपण
महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याची मागणी होत आहे.
मुंबई: महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याची मागणी होत आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्येही याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे.
या याचिकेवेळी सुनावणी करताना बीसीसीआयला मात्र उशीरा शहाणपण सुचलं आहे. दुष्काळासाठी मदत म्हणून आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रुपयांची मदत करु असं बीसीसीआयनं हायकोर्टामध्ये सांगितलं आहे.
तसंच राज्यातल्या लातूर किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी आम्ही ४० लाख लिटरपेक्षा जास्त पाणी देऊ असंही बीसीसीआयनं सांगितलं आहे.
आयपीएलच्या महाराष्ट्रात होणाऱ्या मॅचची तिकीटविक्री झाली आहे. तसंच आयपीएलमध्ये अनेकांचा समावेश आहे, तसंच अनेकांचा फायदा होणार आहे, त्यामुळे आयपीएल महाराष्ट्राबाहेर नेऊ नये अशी मागणी बीसीसीआयनं केली आहे.
नागपूरमध्ये होणाऱ्या मॅच दुसऱ्या ठिकाणी घेण्याबाबत आम्ही विदर्भ क्रिकेट असोसिएशनला सांगितलं आहे. तसंच मुंबई आणि पुण्यातल्या मॅचसाठी आम्ही सांडपाण्यावर प्रक्रिया केलेलं पाणी वापरु, असं आश्वासनही बीसीसीआयनं दिलं आहे.
आयपीएलची पुण्याची टीम रायजिंग पुणे सुपरजायंट्सनंही आयपीएल पुण्याबाहेर न्यायला विरोध दर्शवला आहे. मॅट पुण्याबाहेर झाल्या तर आम्हाला स्थानिकांचा पाठिंबा मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया पुणे टीमच्या वकिलांनी दिली आहे.