बंगळूरु : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बंगळुरुमध्ये 4 मार्चपासून दुसरी टेस्ट रंगणार आहे. पुण्यात पहिल्याच टेस्टमध्ये अवघ्या तीन दिवसांत विजय मिळवत कांगारुंनी टीम इंडियाचा विजयरथ रोखला होता. आता दुस-या टेस्टमध्ये टीम इंडियापुढे कमबॅकचं खडतर आव्हान असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातल्या पहिल्या टेस्टमध्ये अवघ्या तीन दिवसांत टीम इंडिया धारातीर्थी पडली. ऑस्ट्रेलियन स्पिन बॉलर्सपुढे भारतीय बॅट्समन्सनी अक्षरक्षः गुडघे टेकले. स्टिव्हन ओकिफच्या फिरकीपुढे कॅप्टन कोहलीसह सारेच दिग्गज सपशेल फेल ठरले. 


या टेस्टमध्ये कोहली सेनेला 333 रन्सनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. आता हाच पराभव विसरुन टीम इंडिया बंगळुरुच्या दुस-या टेस्टसाठी सज्ज आहे. पुण्यातल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानेच कोहली सेना मैदानात उतरणार आहे. पहिल्या टेस्टप्रमाणे दुस-या टेस्टमध्येही खेळपट्टीची महत्त्वाची भूमिका असेल. 


खेळपट्टीप्रमाणेच भारतीय टीममध्येही दुस-या टेस्टसाठी बदल करण्याच्या चर्चा सुरु झाल्यात. अतिरिक्त बॅट्समन खेळवण्याबाबत कोहली एंड कंपनीची चाचपणी सुरु आहे. तर ऑस्ट्रेलिन टीम विजयी कॉम्बिनेशन कायम ठेवणार असल्याचं समजतंय.


कांगारुंचा सामना करण्यासाठी टीम इंडिया नव्या जोमानं नव्या उत्साहात बंगळुरुत दाखल झाली. पहिली टेस्ट वेळेआधीच संपल्यावर भारतीय क्रिकेटर्सनी ताम्हिणी घाटात ट्रेकिंगचा थरार अनुभवलाय.


आता नव्या जोमात, नव्या उत्साहात पराभव विसरुन ऑलराऊंड कामगिरी सुधारत टीम इंडिया बॉर्डर गावस्कर सीरीजमध्ये कमबॅक करते का याकडं क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.