नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. अवघ्या काही दिवसांवर टी-२० वर्ल्डकप येऊन ठेवलाय. त्यापूर्वीचा भारताचा हा विजय संघाचे मनोबल वाढवण्यास नक्कीच कामी येईल. टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र संघातील सातव्या स्थानासाठी अजिंक्य रहाणे आणि मनीष पांडे यांच्यात टक्कर आहे. इतर फलंदाजांनी संघात स्थान मिळवले असले तरी सातव्या स्थानासाठी रहाणे आणि मनीष यांच्यात चुरस आहे. मनीषने वनडे सामन्यात जबरदस्त शतक झळकावत आपण फॉर्मात असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपमध्ये सातव्या स्थानी अजिंक्य रहाणे की मनीष पांडे यापैकी कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट नाही. 


आगामी श्रीलंका सिरीजसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याने त्याच्या जागी मनीष पांडे खेळेल मात्र आशिया चषकात परतल्यानंतर मनीष पांडेला संघात स्थान मिळणार का याबाबत शंका आहे. 


अजिंक्य रहाणेही सध्या चांगल्या फॉर्मात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग, एमएस धोनी यांचे संघात स्थान निश्चित आहे. मात्र सातवे स्थान कोणाला मिळणार याबाबत निश्चिती नाही. धोनीलाही रहाणेच्या कामगिरीची कल्पना आहे. 


युवराजने तिसऱ्या टी-२०च्या अखेरच्या षटकांत दमदार खेळ करताना फॉर्ममध्ये परतल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे संघात त्याला स्थान मिळेल. तसेच महेंद्रसिंह धोनीही ऑलराउंड क्रिकेटरला प्राधान्य देतो. युवराज सिंग फलंदाजीसोबत गोलंदाजीही करतो.