रांची : टीम इंडियाबाहेर राहिलेल्या युवराज सिंगला संघात स्थान मिळाले तरी त्याला खेळायला मिळत नाही. याबाबत त्याची गर्लफ्रेंड तसेच वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टीका सहन करावी लागत आहे. यावर माहीने त्याल बढती देणे अवघड असल्याचे मत व्यक्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवराज सिंगला बॅटींगसाठी आणखी वरच्या क्रमांकावर पाठविणे अवघड आहे. युवीला बॅटींग करण्याची संधी मिळत असल्याचे धोनीने यावेळी कबूल केले. मात्र, सुरूवातीच्या चार फलंदाजांची कामगिरी उजवी असल्यामुळे युवराजला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे काहीसे शक्य होत नाही.


रांचीत श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यात बॅटींग क्रमवारीत बदल करताना धोनीने युवराजच्याजागी हार्दिक पांड्याला फलंदाजीसाठी पाठवले होते. त्यामुळे युवराजला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. गेल्या काही सामन्यांमध्येही युवराजला पहिल्या पाच खेळाडूंनंतर फलंदाजीची संधी देण्यात येत आहे.


युवराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. तरीही त्याला फलंदाजीची संधी फार कमी मिळत आहे. यासंदर्भात धोनी म्हणाला की, युवराजला फलंदाजीची संधी कमी मिळतेय हे दिसतेय. पण, पहिले चार फलंदाज सर्वोत्तम कामगिरी करत असताना त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविणे शक्य नाही.


मात्र, तरीही युवराजला अधिकाधिक फलंदाजीची संधी देण्याकडे माझा कल असतो. सामना जिंकणे हेच आमचे मुख्य ध्येय असून, विश्वकरंडकात सर्वांना संधी मिळेल, असे धोनीने यावेळी म्हटलेय.