कोलकता: इडन गार्डनवर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. आत्तापर्यंत झालेल्या वर्ल्ड कपच्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, मग तो 50 ओव्हरचा वर्ल्ड कप असो किंवा टी 20 वर्ल्ड कप. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतानं आत्तापर्यंत 11 वेळा पाकिस्तानला वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टी 20 मध्ये हरवलं आहे. त्या आठवणींवर नजर टाकूयात. 


 


1992 सिडनी, ऑस्ट्रेलिया



1992 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला. या मॅचमध्ये भारताच्या विजयाचा हिरो ठरला सचिन तेंडुलकर. सचिननं या मॅचमध्ये 54 रन केल्या, तसंच 1 विकेटही काढली. भारतानं ही मॅच 43 रननं जिंकली. 


1996 बैंगलुरू, भारत 



आमिर सोहेल आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींमुळे हा सामना क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. भारतानं ही मॅच 37 रननं जिंकली. 


1999 मॅन्चेस्टर, इंग्लंड



227 रनचं माफक आव्हान पार करणं पाकिस्तानला अवघड झालं ते व्यंकटेश प्रसादमुळे. या मॅचमध्ये प्रसादनं पाकिस्तानच्या 5 बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं, आणि भारतानं ही मॅच 47 रननं जिंकली. 


2003 सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



भारतानं ही मॅच जिंकली ती सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय खेळीमुळे. या मॅचमध्ये सचिनची सेंच्युरी फक्त 2 रननी हुकली, तरी सचिनची ही खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये भारताचा 6 विकेट आणि 26 बॉल राखून विजय झाला. 


2007 डर्बन, दक्षिण आफ्रिका



पहिल्याच टी 20 वर्ल्ड कपमध्ये हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले, आणि हा सामना टाय झाला. अखेर बॉल आऊटच्या माध्यमातून भारताचा या मॅचमध्ये विजय झाला. 


2007 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका



पहिल्याच टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तो फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. जोगिंदर शर्मानं मिसबाहची विकेट घेतली आणि तब्बल 24 वर्षानंतर भारतानं वर्ल्ड कप पुन्हा एकदा जिंकला. 


2011 मोहाली, भारत 



जेव्हा तुम्ही सचिनचे 4 कॅच सोडाल, तेव्हा मॅच जिंकणं अशक्यच होऊन बसेल. पाकिस्ताननं हे केलं 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये आणि त्यामुळे पाकिस्तानचा या मॅचमध्ये 29 रननं पराभव झाला. 


2012 कोलंबो, श्रीलंका



विराट कोहलीच्या 78 रनच्या खेळीमुळे टी 20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानचा पराभव केला. ही मॅच भारतानं 8 विकेट आणि 3 ओव्हर राखून अगदी सहज जिंकली. 


2014 मीरपूर, बांग्लादेश



ही मॅच भारतानं 7 विकेट राखून जिंकली. कोहली आणि सुरेश रैनानं या  मॅचमध्ये नॉट आऊट राहुन भारताचा विजय सोपा केला. पण लेग स्पिनर अमित मिश्राला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. 


2015 ऍडलेड, ऑस्ट्रेलिया



या मॅचमध्येही भारताचा संकटमोचक ठरला विराट कोहली. या मॅचमध्ये कोहलीनं 107 रनची खेळी केली, आणि भारताला विजय मिळवून दिला. 


2016 कोलकता, भारत



या मॅचमध्येही भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. विराटनं केलेल्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर भारताचा 6 विकेट आणि 13 बॉल राखून विजय झाला.