दुबई : आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. पाकिस्तान तिसऱ्या स्थानी आहे, असं असलं तरी  पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. भारताचे ११२ गुण असून पाकिस्तानचे १११ गुण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच भारताचा रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे, तर गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.


कसोटी क्रमवारीत पाकिस्तान संघ भारतापेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. जर पाकिस्तानने इंग्लंडविरुध्दची ४ सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी किंवा ३-१ अशी जिंकली, तर ते टीम इंडियाला मागे टाकून द्वितीय स्थानी पोहचेल. 


भारत, पाकिस्तान आणि चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंड यांच्या गुणामध्ये खूप कमी अंतर आहे. विशेष म्हणजे २००३ पासून अधिकृतपणे क्रमवारी जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर केवळ एकदाच पाकिस्तानने द्वितीय स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडे अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियालाही हटविण्याची संधी आहे. परंतु, त्यासाठी त्यांना इंग्लंडविरुध्द ३-० अशी बाजी मारावी लागेल.