फ्लोरिडा : अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध शनिवारी भारताची पहिली टी20 तर रविवारी दुसरी टी20 रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जूनमधल्या झिम्बाब्वे दौऱ्यानंतर धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसेल. ही टी 20 सीरिज गमावली तर भारताचं टी 20 मधलं स्थान धोक्यात येणार आहे. सध्याच्या क्रमवारीनुसार न्यूझिलंड 132 पॉईंट्ससह पहिल्या, भारत 128 पॉईंट्ससह दुसऱ्या तर वेस्ट इंडिज 122 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


भारतानं ही सीरिज जिंकली तर न्यूझिलंडबरोबरच भारतचेही 132 पॉईंट्स होतील, पण अंशांच्या फरकामुळे भारताला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल.


टी20 वर्ल्ड कपमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये 4 सिक्स मारून वेस्ट इंडिजला विश्वविजेता बनवणारा कार्लोस ब्रॅथवेट या टीमचा कॅप्टन असणार आहे. तर क्रिस गेल, ड्वॅन ब्रॅव्हो, कायरन पोलार्ड, लिएन्डल सिमन्स, मार्लोन सॅम्युअल्स, आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांच्यासारखे टी20चे दिग्गज खेळाडूही वेस्ट इंडिजच्या टीममध्ये आहेत.