इंग्लंडला अश्विननं लोळवलं, कोहलीनं रडवलं!
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.
विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 98 रनच्या मोबदल्यात तीन विकेट गमावल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये 167 रनची खेळी करणारा कोहली दिवसाअखेरीस नाबाद 56 रनवर खेळत आहे, तर कोहलीबरोबर अजिंक्य रहाणे नाबाद 22 रनवर आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडे आता 298 रनची आघाडी आहे.
इंग्लंडला पहिल्या इनिंगमध्ये 255 रनवर ऑल आऊट करून भारताला तब्बल 200 रनची आघाडी मिळाली तरीही कोहलीनं फॉलोऑन न द्यायचा निर्णय घेतला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली नाही. मुरली विजय 3 तर के.एल.राहुल 10 रनवर आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये सेंच्युरी झळकावणारा चेतेश्वर पुजारालाही फक्त एक रन करता आली.
त्याआधी तिसऱ्या दिवसाची सुरुवात 103/5 अशी करणाऱ्या इंग्लंडनं अश्विनच्या फिरकीपुढे लोटांगण घातलं. अश्विननं इंग्लंडच्या पाच बॅट्समनना तंबूत पाठवलं तर मोहम्मद शमी, उमेश यादव, जयंत यादव आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.