भारत Vs पाकिस्तान : फेसबूकवर दिसली `अमन की आशा`
मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे वातावरण तापलेलं असतं.
मुंबई : भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना म्हणजे वातावरण तापलेलं असतं. दोन देशांतील राजकारणाचे आणि वर्षानुवर्षाच्या तणावपूर्ण संबंधांची छाया त्यांच्यातील खेळांच्या सामन्यांवरही असते. पण, या देशांमधील राजकीय संबंधांच्या पार जाऊन दोन्ही देशांतील क्रिकेटच्या माध्यमातून शांततेच्या स्थापनेसाठी प्रयत्न करतायत... आणि त्याला जबाबदार आहे फेसबुक...
टी-२० विश्वचषकात आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी फेसबुकने काही दिवसांपूर्वी एक नवीन फीचर लॉन्च केलंय. याद्वारे क्रिकेट रसिकांना आपल्या आवडत्या संघाचा बॅच फेसबूककरांना आपल्या प्रोफाईल फोटोवर लावता आला. पण, यामुळे एक अशी घटना घडलीय की ज्याची कल्पना कधी फेसबुकनंही केली नसेल.
भारतातील अनेक तरुणांनी आपल्या फोटोवर पाकिस्तानचा बॅच लावला तर पाकिस्तानातीलही हजारो तरुणांनी भारताचा बॅच लावला. हा बॅच लावून ते एकमेकांना शांततेचा संदेश देतायत. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने एका फेसबूक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती देत आश्चर्य व्यक्त केलंय.
'भारत आणि पाकिस्तान दरम्यान फेसबुकवर काहीतरी अद्भुत आणि आश्चर्यजनक घडतंय... जगभरातील लोक आपापल्या संघांना पाठिंबा देत असताना भारत आणि पाकिस्तानातील नेटकरी मात्र काहीतरी वेगळं करतायत... एकमेकांच्या संघांना पाठिंबा देत #ProfileForPeace म्हणत ते एकमेकांना शांततेचा संदेश देतायत. खरं तर आम्ही हे फीचर लॉन्च केलं तेव्हा आमचा असा काही उद्देश नव्हता... पण, यातून एक गोष्ट सिद्ध होते की आपण जितके जास्त कनेक्टेड होतो तितकी आपल्यात कशामुळे दरी निर्माण होते त्यापेक्षा काय आपल्याला जवळ आणते याची आपल्याला जाणीव होते,' असं झुकरबर्गनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
सध्या भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांमध्ये या पोस्टची चर्चा आहे. निदान खेळाच्या माध्यमातून तरी ही दोन राष्ट्र मनाने एकत्र येतील अशी अनेकांना आशा आहे.