प्रतिस्पर्धी टीम नाही पण, ही गोष्ट मैदानावर करते धोनीला हैराण
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला मैदानावर प्रतिस्पर्धी टीममधून फारसं कुणी त्रासदायक वाटत नसलं तरी त्याला एक गोष्ट मात्र चांगलीच खटकतेय.
मीरपूर : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला मैदानावर प्रतिस्पर्धी टीममधून फारसं कुणी त्रासदायक वाटत नसलं तरी त्याला एक गोष्ट मात्र चांगलीच खटकतेय.
हेडफोनसहीत काही अम्पायरिंग उपकरणांच्या वापरावर धोनीनं आपली नापसंती केलीय. ही उपकरणं खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये बॅटला स्पर्श करून जाणाऱ्या बॉलच्या आवाजाला ऐकण्यापासून अडथळा ठरतात, असं धोनीला वाटतंय.
नुकत्याच झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात अम्पायर एसआयएस सैकत हे आशीष नेहरानं फेकलेल्या बॉलचा आवाज ऐकू शकले नव्हते. हा बॉल बॅटिंगला उभ्या असलेल्या खुर्रमच्या बॅटला घासून गेला होता... यामुळे धोनी थोडा नाराज होता.
अम्पायरिंगबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर धोनीनं पत्रकारांचीच फिरकी घेतली. 'टी२० पूर्वीच तुम्हाला माझ्यावर बंदी आणायचीय का?' असं त्यानं म्हटलं. शिवाय अम्पायर जेव्हा वॉकी टॉकी वापरतात तेव्हा ते एका कानामध्ये हेडफोन वापरतात. म्हणजे ते बॉलचा आवाज ऐकण्यासाठी एकाच कानाचा वापर करतात. मैदानावर अम्पायर्सनं दोन्ही कान वापरणं अधिक योग्य ठरेल असंही धोनीनं म्हटलंय.