बंगळुरुतील टी-२० सामना धोनीचा घरच्या मैदानावर शेवटचा सामना?
इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युझवेंद्र चहलनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला.
नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युझवेंद्र चहलनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही बीसीसीआयकडून सन्मान करण्यात आला.
बीसीसीआयकडून धोनीला थँक्यू गिफ्ट देण्यात आले. गेल्या एका दशकापासून धोनीने यशस्वीपणे भारतीय संघाची धुरा सांभाळली होती. ४ जानेवारीला धोनीने तडकाफडकी वनडे आणि टी-२०चा राजीनामा दिला. त्यानंतर विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आले. त्याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तो क्रिकेटपटू म्हणून खेळत आहे. तसेच गरज भासल्यास विराटलाही निर्णय घेण्यात सहकार्य करतोय.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर बीसीसीआयने धोनीला गिफ्ट देऊन सत्कार केला. तसेच ट्वीटमध्येही बीसीसीआयने "Inspirational. Captain par-excellence. Thank you - #TeamIndia."असे म्हटलेय.
येत्या जूनमध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. त्यापूर्वी भारत बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामने खेळणार आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी धोनीची शेवटची स्पर्धा असल्याची चर्चा रंगलीये. दरम्यान, धोनीने मात्र यापूर्वीच आपण २०१९मध्ये होणाऱ्या टी-२०वर्ल्डकपमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केलीये.