रिओ ऑलिम्पिकमध्ये नवा इतिहास रचण्यासाठी ललिता बाबर सज्ज
महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे तिनं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. आता फायनलमध्ये ललिता मेडल पटकावून रिओमध्ये देशाची पताका फडकावते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय.
रिओ : महाराष्ट्राची धावपटू ललिता बाबरनं रियो ऑलिम्पिकमध्ये 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात फायनलमध्ये धडक मारलीय. विशेष म्हणजे तिनं प्राथमिक फेरीत राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. आता फायनलमध्ये ललिता मेडल पटकावून रिओमध्ये देशाची पताका फडकावते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून राहिलय.
ललिता बाबर. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावातील ही धावपटू. तिनं मोठा संघर्ष करत आपल्या मेहनतीच्या बळावत मोही ते रियो असा खडतर प्रवास केलाय. आता रियोमध्ये ती इतिहास रचण्यासाठी सज्ज झालीय.
कारण ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात तिनं फायनल गाठलीय. प्राथमिक फेरीत ती चौथ्या स्थानी राहिली. मात्र तिनं चांगल्या वेळेची नोंद केली आणि तिला फायनलचं तिकीट मिळालं.
ललितानं प्राथमिक फेरीत 9मिनिट 19.76 सेकंदांची वेळ नोंदवली. यापूर्वी 3हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताचा विक्रम सुधा सिंगच्या नावे होता. सुधा सिंगनं यापूर्वी 9 मिनिट 26.55 सेकंदांची वेळ नोंदवली होती. विशेष म्हणजे तब्बल 32 वर्षांनी ऍथलेटिक्समध्ये फायनल गाठणारी ललिता पहिला खेळाडू ठरली.
ललितासमोर आता फायनलमध्ये बहरिन, केनिया, इथियोपिया, अमेरिका, जर्मन आणि ट्युनिशिया या देशातील खेळाडूंच आव्हान असेल. ललितानं प्राथमिक फेरीत तिच्या करियरमधील सर्वोत्तम वेळेची नोंद केलीय. आता ललितासमोर मेडल पटकावण्यासाठी यापेक्षाही कमी वेळेची नोंद करण्याचं आव्हान असेल.
ललिताची फायनल 15 ऑगस्टला रात्री 7.45वाजता असेल. ललिता आता फायनलमध्ये काही चमत्कार घडवते का आणि भारताला रियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या मेडलची कमाई करुन देते का याकडेच तमाम क्रीडाप्रेमींच लक्ष लागून राहिलय.