एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती
भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
चेन्नई : भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2004च्या पाकिस्तान सीरिजमधली बालाजीची कामगिरी उल्लेखनीय होती. निवृत्ती घेतली असली तरी बालाजी आयपीएल आणि तामीळनाडू प्रीमियर लीग या टी-20 टूर्नामेंटमध्ये खेळणार आहे.
बालाजीनं 8 टेस्टमध्ये 27 विकेट, 30 वनडेमध्ये 34 विकेट आणि 5 टी-20मध्ये 10 विकेट घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बालाजीनं 106 मॅचमध्ये 330 विकेट घेतल्या होत्या.
2004 सालच्या पाकिस्तान दौऱ्यावेळी बालाजी प्रकाशझोतात आला. तीन मॅचच्या या टेस्ट सीरिजमध्ये बालाजीनं 12 विकेट घेतल्या होत्या. भारतानं ही सीरिज 2-1नं जिंकली होती. दुखापत आणि फॉर्ममुळे बालाजी भारतीय टीममधून सतत आत-बाहेरच असायचा.
2011मध्ये बालाजीनं भारतीय टीममध्ये टी-20मधून पुनरागमन केलं होतं. 2012 साली दक्षीण आफ्रिकेविरुद्ध कोलंबो टी-20 ही त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच होती.
निवृत्तीची घोषणा करताना बालाजीनं तामीळनाडू क्रिकेट बोर्डचे आभार मानले आहेत. तसंच झहीर खाननं आपल्याला नेहमीच पाठिंबा आणि महत्त्वाच्या वेळी सल्ला दिल्याचं बालाजी म्हणाला आहे.