धोनी संतापला दिली फिक्सिंग प्रकरणी धमकी
महेंद्रसिंग धोनीनं कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
मुंबई : एका हिंदी वृत्तपत्राला 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीनं कायदेशीर नोटीस पाठवली आहे. २०१४च्या इंग्लंड दौऱ्यात मॅन्चेस्टर कसोटीतील भारताचा पराभव 'फिक्स' असल्याचा दावा स्टिंग ऑपरेशनच्या आधारे हा आरोप करण्यात आला होता.
हा आरोप बिनबुडाचा असून वृत्तपत्रानं बातमी मागे घ्यावी, नाहीतर मानहानीचा १०० कोटींचा दावा ठोकू, असा इशारा 'माही'च्या वकिलांनी व्यवस्थापनाला दिला आहे.
टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक सुनील देव यांच्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत, एका हिंदी वृत्तपत्रानं महेंद्रसिंग धोनीवर फिक्सिंगचा ठपका ठेवला होता. दोन वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियानं यजमानांविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी गमावली होती.
या मालिकेतील मॅन्चेस्टर कसोटी 'फिक्स' होती, टॉस जिंकल्यास क्षेत्ररक्षण घेण्याचं ठरलं असतानाही धोनीनं अचानक फलंदाजीचा निर्णय घेतला होता, परिणामी भारताचा एका डावाने दारूण पराभव झाला होता, असा गौप्यस्फोट सुनील देव यांनी आपल्या स्टिंगमध्ये केल्याचा दावा वृत्तपत्रानं केला होता.
या बातमीनं क्रिकेटविश्वात खळबळ उडाली होती. त्यानंतर लगेचच, आपण फिक्सिंगबाबत कुठलंही वक्तव्य केलं नसल्याचा खुलासा देव यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर, महेंद्रसिंग धोनीनं आपली बाजू मांडण्यासाठी थेट कायद्याचाच आधार घेतला आहे. त्याच्या दिल्लीतील वकिलांनी सदर वृत्तपत्राला नोटीस पाठवली आहे आणि आपल्या अशिलाची माफी मागण्यास सांगितलंय.
स्टिंग ऑपरेशनचा जो कथित व्हिडिओ तुम्ही दाखवताय तो संशयास्पद आहे. स्वतः सुनील देव यांनीही, असं काही झालेलंच नसल्याचं स्पष्ट केलंय. म्हणजेच, या खोट्या प्रचारामागे धोनीच्या बदनामीचाच हेतू दिसतोय. त्यामुळे ४८ तासांत आपलं वृत्त मागे घेऊन धोनीची माफी मागावी, अन्यथा आम्ही तुमच्यावर १०० कोटींचा बदनामीचा दावा ठोकू, असं त्यांनी ठणकावलंय. आता त्यावर वृत्तपत्र व्यवस्थापन काय भूमिका घेतं, हे पाहावं लागेल.