मुंबई : एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. सुप्रीम कोर्टानं लोढा समितीनं केलेल्या शिफारसींना मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर होत असलेली ही बैठक महत्त्वपूर्ण असल्याचं मानलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

70 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली व्यक्ती बीसीसीआय किंवा स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या पदावर राहू शकत नाही, तसंच क्रिकेट समितीमध्ये नऊ वर्ष पूर्ण केल्यावरही सदस्य अपात्र होईल, असं लोढा समितीच्या शिफारसींमध्ये आहे. 


लोढा समितीच्या या शिफारसींमुळे शरद पवार हे अध्यक्षपदासाठी अपात्र झाले आहेत. कारण पवारांचं वय हे 70 पेक्षा जास्त आहे, तसंच त्यांना क्रिकेट समितीमध्ये नऊ वर्षही झालेली आहेत. 


भारताचा माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर याचीही नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. शरद पवार आणि वेंगसरकर यांच्याबरोबरच एमसीएचे सचिव पी.व्ही.शेट्टी आणि नितीन दलाल हेदेखील अपात्र झाले आहेत. 


लोढा समितीनं एक राज्य एक मत याचीही शिफारस केली होती. महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, मुंबई क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया या समित्या आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर उद्याच्या एमसीएच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. या बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषदही घेणार आहेत.