हशीम अमलाच्या सेंच्युरीनंतरही मुंबईचा दणदणीत विजय
हशीम अमलाच्या शानदार सेंच्युरीनंतरही मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली आहे.
इंदूर : हशीम अमलाच्या शानदार सेंच्युरीनंतरही मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली आहे. १९८ रन्सचं लक्ष्य मुंबईनं फक्त दोन विकेट गमावून आणि १५.३ ओव्हर्समध्येच पूर्ण केलं. मुंबईच्या या विजयाचे शिल्पकार ठरले जॉस बटलर आणि नितीश राणा.
बटलरनं ३७ बॉल्समध्ये ७७ रन्सची खेळी केली. यामध्ये ७ फोर आणि ५ सिक्सचा समावेश होता. तर नितीश राणानं ३४ बॉल्समध्ये नाबाद ६२ रन्स केल्या. या खेळीमध्ये नितीशनं ७ सिक्स लगावल्या. ओपनिंगला आलेल्या पार्थिव पटेल आणि बटलरनं पंजाबच्या बॉलर्सचा धुव्वा उडवला. पटेलनं १८ बॉल्समध्ये ३७ रन्स केल्या.
याआधी टॉस जिंकून मुंबईनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला पण हशीम अमला आणि ग्लेन मॅक्सवेलच्या सेंच्युरीमुळे पंजाबनं २० ओव्हर्समध्ये १९८ रन्स बनवल्या. अमलानं ६० बॉल्समध्ये १०४ रन्स केल्या. अमलाच्या या खेळीमध्ये ६ सिक्स आणि ८ फोरचा समावेश होता. अमलाला पंजाबचा कॅप्टन ग्लेन मॅक्सवेलनंही चांगली साथ दिली. मॅक्सवेलनं १८ बॉल्समध्ये ४० रन्सची खेळी केली. यामध्ये ४ फोर आणि ३ सिक्सचा समावेश होता.
बईकडून मॅकलेनघननं सर्वाधिक दोन विकेट तर कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक विकेट घेतली. यंदाच्या आयपीएल मोसमातली ही दुसरी सेंच्युरी आहे. याआधी दिल्लीच्या संजू सॅमसननं पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये सेंच्युरी झळकावली होती.