नालासोपारा :  भारतात प्रो कबड्डीमुळे अनेक जण कबड्डीचे चाहते झाले आहे.  उत्कंठावर्धक क्रिकेट सामान्यात प्रेक्षकांचा हार्ट अॅटकने मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील पण आता भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी स्पध्रेचा अंतिम सामना पाहताना युवा कबड्डीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतीक तनावडे (२२) असे या तरूणाचे नाव आहे. प्रतीक हा नालासोपारा पश्चिमेच्या समेळपाडा येथील ओंकार निवास या इमारतीत राहात होता. शनिवारी रात्री भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना तो पाहत होता. 


रात्री पावणे नऊच्या सुमारास अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


प्रतीक उत्तम कबड्डीपटू होता. तो लिटिल फ्लॉवर या शाळेच्या कबड्डी संघाचा प्रशिक्षकही होता. त्याने बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.


येत्या १ नोव्हेंबर रोजी तो ऑर्चिड या पंचतारांकित हॉटेलात रुजू होणार होता. प्रतीक तनावडेच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.