मुंबई : एखाद्या जिद्दीला, मेहनतीला, दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि अंगभूत कलागुणांना कोणतीही प्रतिकूल परिस्थिती फार काळ रोखून ठेऊ शकत नाही, हे मुंबईच्या ओमकार नेटकेकडे पाहिल्यावर लक्षात येईल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार माणसांना नीट उभंही राहता येणार नाही, एवढ्या छोट्या लोअर परेलमधील घरात कॅरम खेळाडू ओमकार राहतोय. हे घर कितीही छोट असलं तरी या घरात राहणारा ओमकार याची स्वप्न मात्र विशाल आहेत. त्यानं केवळ स्वप्नं पहिली नाहीत तर ती सत्यातही उतरवली.


ओमकारनं नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या एशियन कॅरम स्पर्धेत भारताला गोल्ड मेडलची कमाई करून दिलीय. याखेरीज सहावेळा त्यानं राष्ट्रीय पातळीवरही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत विजेतेपद पटकावली आहेत. 
 
ओमकारच्या घरची परिस्थिती अगदीच बेताची... आईवडील लाँड्री आणि गोळ्या-बिस्किट विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताहेत, ओमकारही त्यात हातभार लावतो... आणि न चुकता दररोज किमान दोन तास कॅरमचा सरावही करतो. ओमकारची ही परिस्थिती आणि त्याचे कौशल्य पाहून संदीप सावला या कॅरमप्रेमी माणसानं त्याच्या खेळाचा खर्च उचलला आहे. 


ओमकार मुंबईतील महर्षी विवेकानंद कॉलेजमध्ये बीएच्या पहिल्या वर्गात शिकत आहे. परिस्थितीशी झगडून ओमकार पुढे जाऊ पाहतो आहे. सीनिअर नॅशनल खेळण्याचं त्याचं स्वप्न आहे. परिस्थिती कितीही विपरित असुदे, महत्वाकांक्षा, जिद्द आणि मेहनत करायची इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही हेच आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू ओमकार नटके यानं सिद्ध करून दाखवलंय. म्हणूनच त्याच्या या यशाचं अप्रूप वाटल्याखेरीज राहत नाही. त्याच्यासारखा गुणी खेळाडू भारतासाठी नवनवे विक्रम करत राहो हे भारतीयांचंही स्वप्न प्रत्यक्षात उतरो, ही आशा...