पाक क्रिकेट बोर्डाची गयावया, `बुलेटप्रूफ` गाड्या देतो; पण खेळा!
पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क `बुलेटप्रूफ` गाड्या खरेदी केल्यात.
इस्लामाबाद : आधीच डबघाईला आलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अवस्था केविलवाणी झाली आहे. पाक क्रिकेट बोर्डाने अन्य देशातील खेळाडूंनी खेळावे यासाठी चक्क 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्यात. आम्ही तुम्हाला 'बुलेटप्रूफ' गाड्या देतो पण आमच्या येथे खेळा, अशी गयावया करण्यास सुरुवात केलेय.
दहशतवादाच्या सावटाखालीही अन्य देशातील क्रिकेट संघांनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणे टाळले आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली सुरक्षा पुरवतो, असे सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) चार 'बुलेटप्रूफ' गाड्या खरेदी केल्या आहेत. यामुळे परदेशी खेळाडूंना सुरक्षेची खात्री देता येऊ शकेल आणि त्यामुळे पाकिस्तानमध्ये पुन्हा क्रिकेट सुरू होऊ शकेल, अशी आशा पाक बोर्डाला आहे. याबाबत असे 'पीसीबी'च्या प्रवक्त्याने 'क्रिकइन्फो'ला सांगितले.
Having these bulletproof vehicles would play
a major part in convincing teams about
security arrangements.
- PCB spokesman
पाकिस्तानच्या दौऱ्यावर २००९मध्ये श्रीलंकन क्रिकेट संघ होता. त्यावेळी त्यांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे सहा खेळाडू जखमी झाले होते आणि पाकिस्तानी सुरक्षा दलांमधील सहा जण ठार झाले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झालेले नाहीत.
दरम्यान, पाकिस्तानचे घरचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत आहेत. पाकिस्तानने अनेक प्रयत्न केले. मात्र, दुसऱ्या देशातील कोणत्याही मोठ्या संघाने पाकिस्तानच्या दौऱ्यावर येण्यास तयारी दर्शविली नाही. गेल्या वर्षी झिंबाब्वेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता.