गुरू गोपीचंद...भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य
पुलेला गोपीचंद.... भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य... सायना, सिंधू, श्रीकांत, कश्यप सारख्या हि-यांना पैलू पाडण्याचं काम त्यानं केलं.
मुंबई : पुलेला गोपीचंद.... भारतीय बॅडमिंटनचा द्रोणाचार्य... सायना, सिंधू, श्रीकांत, कश्यप सारख्या हि-यांना पैलू पाडण्याचं काम त्यानं केलं. आणि शिष्यांनीही ऑलिम्पिक मेडल्सची गुरूदक्षिणा देत गोपीचंदचा विश्वास सार्थ ठरवाला आहे.
सायना नेहवाल, पी.व्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप, अरुंधती पानतावणे, गुरुसाई दत्त आणि अरुण विष्णू, पुलेला गोपिचंद यांच्या खाणीतून भारतीय बॅडमिंटनला मिळालेली ही रत्नं. ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशीप जिंकल्यानंतर गोपीचंदला दुखापतींनी ग्रासलं आणि त्यानं तिथेच थांबवण्याचा निर्णय घेतला.
यानंतर त्यानं भारतासाठी चांगले बॅडमिंटनपटू घडवण्याचा विडा हाती घेतला. आपल्या पुढच्या पिढीला बॅडमिंटन खेळण्यासाठी चांगल्या सुविधा मिळतील हे लक्ष्य त्यानं डोळ्यासमोर ठेवलं आणि पुलेला गोपीचंद अॅकेडमीत त्यानं उद्याच्या चॅम्पियन्सना पैलू पाडायला सुरुवात केली. त्याच्या ऍकेडमीतून पहिली चॅम्पियन भारताला मिळाली होती ती सायना नेहवाल. नेहवालनं पुलेला गोपीचंदचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न साकार केलं. नेहवालनं 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकत इतिहास रचला. मात्र, या ऑलिम्पिकनंतर या दोघांमध्ये काही वाद झाला आणि ही गुरु-शिष्यांची जोडी विभक्त झाली आणि यानंतरच सायनाचा डाऊनफॉल सुरु झाला.
सायनाबरोबरच सिंधूलाही त्यानं मार्गदर्शन केलं. सिंधूनं आपल्या गुरुला जराही निराश केलं नाही. सिंधूनं 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक मेडल जिंकून दिलं. ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. गोपीचंदच्या डोळ्यांनी जे स्वप्न पाहिलं. ते सिंधूनं पूर्ण केलं.
सायना सिंधूबरोबर किदम्बी श्रीकांतही गोपीचंदच्याच मुशीत तयार झाला आहे. त्यानंही रिओ ऑलिम्पिकची क्वार्टर फायनल गाठली. मात्र, श्रीकांतला ऑलिम्पिक मेडल जिंकण्यात यश आलं नाही.
पारुपल्ली कश्यप अरुंधती पानतावणे, गुरुसाई दत्त आणि अरुण विष्णू यालाही घडवण्यात पुलेला गोपीचंदचा मोठा वाटा आहे. बॅडमिंटनमध्ये मेडल जिंकून आणण्याचं सव्वाशे कोटी भारतीयांच स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेणा-या खेळाडूंना सलाम करुया पण त्यांना घडवणा-या द्रोणाचार्यालाही हॅट्स ऑफ.