नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताच्या पदरी पराभव पडला असला तरी हा संघ योग्य असल्याचे धोनीचे म्हणणे आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसाठीही धोनी हाच संघ कायम राखण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसोटी कर्णधार विराट कोहलीला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असली तरी मात्र आशिया कपमध्ये तो संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे उर्वरित क्रिकेटरपैकी एकाला संघात स्थान मिळणार नाही. त्यामुळे हा क्रिकेटर कोण असेल याबाबत साशंकता आहे. सलामीला रोहित शर्माच्या जोडीला अजिंक्य रहाणे अथवा शिखर धवन यांच्यात स्पर्धा आहे. जर निवड समितीने रोहितसोबत अजिंक्यला सलामीसाठी निवडल्यास धवनला संघात स्थान मिळणार नाही. 


सध्याच्या घडीला भारतीय संघ हार्दिक पांड्याला संघातून वगळू शकत नाही. रहाणेला गेल्या सामन्यात जरी मोठी खेळी करता आली नसली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने सातत्याने चांगल्या खेळी केल्या होत्या. मात्र दुसरीकडे शिखर धवनच्या खेळात सातत्य दिसत नाहीये. 


त्यामुळे अंतिम ११ मधून धवनला वगळल्यास रहाणेचे संघात स्थान कायम राहील. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील अद्याप दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे पुढील दोन सामन्यांत हे दोघेही क्रिकेटपटू कसा खेळ करतात यावर अंतिम ११ मधील त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. 


मधल्या फळीत युवराज सिंग आणि सुरेश रैना वगळणे भारताला परवडणार नाही. ते दोघेही केवळ चांगले फिनिशरच नाहीत तर गरजेच्या वेळेस ते ऑलराउंडरची भूमिका बजावतात. त्यामुळे पुढील दोन्ही सामने धवन आणि रहाणेसाठी महत्त्वाचे आहेत.