मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. कोच म्हणून राहुल द्रविडला पहिली पसंदी होती. राहुल द्रविडबरोबर याबाबत बोलणंही झालं होतं, पण राहुल द्रविडला ज्युनियर क्रिकेट टीमचं कोचिंग करण्यात रस होता, असं अनुराग ठाकूर म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल द्रविडचं हेच वेगळेपण आहे. बक्कळ पैसा असणारी टीम इंडियाचा कोच व्हायची ऑफर द्रविडनं नाकारली अशी प्रतिक्रिया अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. मला घर आणि कुटुंबाला जास्त वेळ द्यायचा आहे, त्यामुळे मी ज्युनियर टीमचा कोच होईन असं राहुल द्रविड याआधीच म्हणाला होता. 


एक वर्षासाठी अनिल कुंबळेची भारताचा कोच म्हणून निवड झाली आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यापासून कुंबळेची नवी इनिंग सुरु होईल. बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये असलेल्या सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कुंबळेच्या नावाची शिफारस बीसीसीआयला केली होती. 


45 वर्षांच्या कुंबळेनं 132 टेस्टमध्ये 619 विकेट आणि 271 वनडेमध्ये 337 विकेट घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये कुंबळेनं मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर या टीमचंही कोचिंग केलं आहे.