64 घरांच्या राणीला वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब
रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक सरस ग्रँडमास्टर्सचा पराभव केलाय कोल्हापूर कन्या ऋचा पुजारीनं. ऋचानं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावलाय. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्यातली पहिली खेळाडू ठरली.
प्रताप नाईक, कोल्हापूर : रशियातल्या बुद्धीबळ स्पर्धेत एकापेक्षा एक सरस ग्रँडमास्टर्सचा पराभव केलाय कोल्हापूर कन्या ऋचा पुजारीनं. ऋचानं वुमेन इंटरनॅशनल मास्टरचा किताब पटकावलाय. बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरचीच नव्हे, तर राज्यातली पहिली खेळाडू ठरली.
मॉस्कोमध्ये झालेल्या एरोफ्लोट बुद्धीबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋचा पुजारीनं चांगली कामगिरी केली. मॉस्कोमध्ये एरोफ्लोट स्पर्धा ही ए, बी आणि सी या तीन गटांमध्ये होते. त्यात ए गटासाठी आंतरराष्ट्रीय रेटिंग २४०० अंकांच्यावर असावं लागतं. ऋचानं २२०० रेटिंग पार केल्यानं ती बी गटात खेळत होती. ब गटामध्ये तिचा सामना ९ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटूंशी झाला. त्यामध्ये ऋचानं एकाग्रता आणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर ३.५ गुणांची कमाई केली आणि ती वुमेन इंटरनॅशनल मास्टरची मानकरी ठरली.
वुमेन इंटरनॅशनल मास्टर या किताबासाठी तीन स्पर्धांमध्ये ठसा उमटवणं गरजेचं असतं. ऋचाने यापूर्वी फिलिपिन्स, उझबेकिस्तान इथल्या स्पर्धामध्ये चमकदार कामगीरी केली होती. पण, त्यानंतरच्या काही स्पर्धांमध्ये तिला अपयश येत होतं. पण ऋचानं जोरदार मुसंडी मारत मॉस्को इथल्या स्पर्धेत चमकदार कामगीरी करत दमदार कमबॅक केलंय.
ऋचाने आठ-आठ तास सराव करून स्पर्धेची तयारी केली होती, ऋचाच्या या मेहनतीला यश आल्यानं तिचे कुटुंबीयही आनंदात आहेत. आता ऋचा वुमेन ग्रँडमास्टरची तयारी करत आहे.