धोनीने फिरकी घेतलेल्या पत्रकाराचे स्पष्टीकरण
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारला. यावर धोनीने उलट त्याची फिरकी घेत वेगळ्याच शैलीत उत्तर दिले. यावर त्या पत्रकाराने ब्लॉग लिहून स्पष्टीकरण दिलेय.
मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराने निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारला. यावर धोनीने उलट त्याची फिरकी घेत वेगळ्याच शैलीत उत्तर दिले. यावर त्या पत्रकाराने ब्लॉग लिहून स्पष्टीकरण दिलेय.
धोनीला निवृत्तीबाबतचा प्रश्न विचारणारा पत्रकार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या cricket.com.au या वेबसाईटचा रिपोर्टर सॅम्युअल फेरिस आहे. धोनी प्रकरणानंतर फेरिसने ब्लॉग लिहून स्पष्टीकरण दिले.
मला वाटले २०१४ मध्ये ज्याप्रमाणे धोनीने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय जाहीर केला होता. त्याप्रमाणे यावेळीही सर्वांना आश्चर्यचकित करेल. भारतीय पत्रकारांनी त्याला हे विचारले नाही म्हणून मी विचारले.
तो आताही बॅटिंग करतोय. त्याची किपींगही चांगली आहे. मात्र तो आता ३४ वर्षांचा आहे. विराट त्याची जागा घेऊ शकतो. यावेळी यंग टॅलेंटला संधी देण्याची गरज आहे, असे फेरिसने म्हटलेय. धोनीच्या पत्रकार परिषदेनंतर मी रात्रभर झोपलो नाही. लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स येत होत्या. ज्यामुळे रात्रभर मला झोप आली नाही. हा प्रश्न आधी भारतीय पत्रकार विचारायचे. यावेळी मी विचारले. त्यांचा चेहरा पाहून असे वाटले की या प्रश्नाने त्यांना राग येतो आणि त्यांनी आधीच याचे उत्तर तयार केले होते. त्या परिषदेनंतर लोकल मीडियाने माझी बदनामी केली. तिथे जे काही झाले ते मी विसरु शकत नाही, असेही फेरिसने ब्लॉगमध्ये लिहिलेय.