शारजा : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल २१ वर्षे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीने याआधीच कसोटी आणि वनडेतून निवृत्ती घेतली होती. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये त्याने पाकिस्तान संघाचे नेतृत्व केले होते. या स्पर्धेनंतर त्याने कर्णधारपद सोडले मात्र आपण संघात खेळत राहणार असल्याचे म्हटले होते. अखेर काल त्याने निवृत्ती जाहीर केली.


१९९६मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ३७ धावांत शतक झळकावल्यानंतर आफ्रिदीला मोठा प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या दुसऱ्याच वनडे सामन्यात त्याने ही किमया साधली होती. हा रेकॉर्ड तब्बल १७ वर्षे कायम राहिला होता. मात्र कालांतराने त्याच्या बॅटिंगची जादू कमी होत गेली. 


असे असले तरी गोलंदाजीत त्याने प्रभावी कामगिरी करण्यास सुरुवात केली होती. त्याने आपल्या प्रभावी खेळीच्या जोरावर अनेकदा पाकिस्तानला सामने जिंकून दिलेत. यात २००९मधील टी-२० वर्ल्डकपच्या जेतेपदाचा समावेश आहे. 


आफ्रिदीने २७ कसोटी सामन्यांत ११७६ धावा केल्या तर ४८ विकेट मिळवल्या. त्याचा सर्वाधिक स्कोर १५६ इतका आहे. तर ३९८ वनडेत त्याने ८०६४ धावा केल्या. तर ३९५ विकेट घेतल्या. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या रेकॉर्डमध्येही आफ्रिदीचे नाव आहे.