मुंबई : भारताच्या सर्वोत्तम कॅप्टनपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. परदेशामध्ये भारतानं सौरव गांगुलीच्या कॅप्टनशीपमध्ये अनेक मॅच जिंकल्या आणि अनेक विश्वविक्रम केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा हाच यशस्वी कॅप्टननं कॅप्टनशीप सोडायचा निर्णय 2005मध्ये घेतला होता. हे प्रकरण मॅच फिक्सिंग किंवा ग्रॅग चॅपलचं नाही, तर टीममधल्या खेळाडूंनी केलेल्या आरोपांमुळे दादा जवळपास रडलाच होता. खुद्द सौरव गांगुलीनंच ही कबुली दिली आहे. 


2005ला कोचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मॅच आधी सौरव गांगुली टीमच्या बैठकीत आला. या बैठकीसाठी भारतीय खेळाडू आधीच येऊन बसले होते. पण यानंतर झालेल्या गोष्टी धक्कादायक होत्या. असं गांगुली म्हणाला आहे. 


त्या बैठकीत सेहवाग, युवराज आणि हरभजन सिंग यांनी गांगुलीला एक वर्तमानपत्र दिलं. या वर्तमानपत्रामध्ये गांगुलीनं टीममधल्या खेळाडूंवर टीका केली होती. या टीकेचा जाब खेळाडूंनी दादाला विचारला. 


वृत्तपत्राला अशी कोणतीही मुलाखत दिलं नसल्याचं स्पष्टीकरण गांगुलीनं दिलं तरीही या खेळाडूंनी ते मान्य केलं नाही. यामुळे मी खूप दु:खी झालो होतो, रडायचाच बाकी होतो आणि तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी कॅप्टनशीप सोडतो असं गांगुलीनं बैठकीत सांगितलं. 


सौरव गांगुलीचा रडवेला चेहरा बघितल्यानंतर अखेर राहुल द्रविड त्याच्या मदतीला धावून आला आणि हा सगळा प्रकार म्हणजे एप्रिल फूल असल्याचं त्यानं सांगितलं. सौरव गांगुलीला एप्रिल फूल बनवण्यासाठी तशाप्रकारचं खोटं वर्तमानपत्र तयार करण्यात आलं होतं, आणि त्यामध्ये सौरव गांगुलीची खेळाडूंवर टीका करणारी मुलाखतही छापण्यात आली होती.