अंकुर त्यागी, मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलंय. रवि शास्त्री यांनी विराट कोहलीला क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटच्या नेतृत्वाची धुरा देण्यात यावी असं वक्तव्य केलंय. यावर क्रिकेट जगतात वेग-वेगळी मतं दिसून येतायत.


नवा वाद... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टेस्ट टीमचं नेतृत्व विराट कोहली करतोय. तर वन-डे आणि टी-20 साठी महेंद्रसिंग धोनी टीम इंडियाचं नेतृत्व करतोय. त्यातच पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत मला खेळायचंय असं धोनीनं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे रवि शास्त्रींनी कोहीलाला क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटची जबाबदारी सोपवण्यात यावी, असं मत व्यक्त केलंय. यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय. 


मात्र, रवि शास्त्रींच्या वक्तव्यावर भारतीय क्रिकेटमध्ये दोन वेग-वेगळी मतं दिसून येतातय. अजित वाडेकर यांनीही शास्त्रींच्या सुरात सुर मिसळलाय. त्यांनीही क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमध्ये एकच कॅप्टन असावा असं म्हटलंय. 


'विराट दबाव हाताळण्यास असमर्थ'


मात्र, काही क्रिकेटर या मताशी सहमत नाहीत. भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझहरुद्दीननं धोनीचा करिश्मा आजही कायम असल्याचं म्हटलंय. त्यामुळे वन-डे आणि टी-20 कॅप्टन्सी धोनीकडेच ठेवावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तर कोहली तिन्ही फॉरमॅटमध्ये कॅप्टन्सीचा दबाव हाताळू शकणार नसल्याचं विनोद कांबळीनं म्हटलंय. 


ऑल इज नॉट वेल... 


भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि रवि शास्त्री यांच्यात 'ऑल इज नॉट वेल' असल्याच्या बातम्या येतच असतात. २०१४ मध्ये धोनीनं अचानक टेस्टला अलविदा केला होता. त्यावेळी शास्त्री आणि विराट कोहलीला यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं होतं. विराट बीसीसीआयचा सध्याच्या घडीला सर्वात लाडका क्रिकेटर आहे. त्यातच भारताच्या प्रशिक्षकपदासाठी रवि शास्त्रीही अर्ज करणार आहेत. त्यामुळे शास्त्रींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.