अंपायरनं क्रिस गेलला बॅटिंगपासून रोखलं
टी 20 वर्ल्ड कपच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे.
बंगळुर: टी 20 वर्ल्ड कपच्या श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे. वेस्ट इंडिजनं 7 विकेट राखून श्रीलंकेला हरवलं, त्यांच्या या विजयाचा हिरो ठरला तो आंद्रे रसेल.
बैंगळुरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या मॅचमध्ये श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 122 पर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिजनं हे लक्ष्य 18.2 ओव्हरमध्ये गाठलं.
पण या मॅचमध्ये बैंगळुरच्या प्रेक्षकांना कमी भासली ती म्हणजे क्रिस गेलची. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये धडाकेबाज सेंच्युरी मारल्यानंतर गेल पुन्हा एकदा वादळी इनिंग खेळेल अशी त्यांची अपेक्षा होती.
आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर बैंगळुर टीमकडून गेल खेळतो, त्यामुळे बैंगळुरुमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणावर फॅन्स आहेत. या फॅन्सनीही वी वॉन्ट गेल अशा घोषणा स्टेडियममध्ये दिल्या.
गुडघ्याचा स्नायू दुखावल्यामुळे वेस्ट इंडिजच्या बॉलिंगवेळीच गेल पॅव्हेलियनमध्ये गेला. आयसीसीच्या नियमानुसार एखादा खेळाडू जेवढावेळ मैदानाबाहेर जातो तेवढा वेळ त्याला बॅटिंग करता येत नाही. त्यामुळे क्रिस गेलला या मॅचमध्ये बॅटिंग करता आली नाही.
दिनेश रामदिनची विकेट गेल्यानंतर क्रिस गेल बॅटिंगला येत होता पण अंपायर इयन गुल्ड यांनी त्याला बॅटिंगला येण्यापासून रोखलं.