ढाका : आशिया कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवत टीम इंडियाने फायनलचे स्थान पक्के केलेय. त्यामुळे आता अंतिम फेरीत भारताचा मुकाबला कोणाशी होणार आहे याबाबत उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुणतक्ता पाहिला असता तीन सामन्यांपैकी तीनही सामने जिंकणारा भारत अव्वल स्थानी आहे. तर तीनपैकी दोन सामने जिंकणारा बांगलादेश दुसऱ्या स्थानी आहे. श्रीलंकाही आतापर्यंत तीन सामने खेळलीये. त्यापैकी त्यांना केवळ एक विजय मिळवता आलाय. तर दोन सामने ते हरलेत. पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले असून त्यांनी एक सामना जिंकला तर एक गमावलाय. फायनलसाठी खरी चुरस बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात असणार आहे. 


पाकिस्तानकडे फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांच्याकडे दोन सामने आहेत. या दोन्ही सामन्यांत पाकिस्तानने विजय मिळवल्यास आशिया कपच्या फायनलमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान भिडत पाहता येईल. 


आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यास ते फायनलच्या दिशेने कूच करतील. मात्र त्याचबरोबर त्यांना चौथा सामना जिंकणेही गरजेचे ठरणार आहे. 


जर आजच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवल्यास फायनलमध्ये बांगलादेशचे स्थान निश्चित होईल. त्यामुळे आता भारताविरुद्ध बांगलादेश की पाकिस्तान हे आजच्या सामन्यावरुन कळेल. 


संयुक्त अरब अमिरातीने आतापर्यंतच्या तीनही सामन्यात पराभव पाहिलाय त्यामुळे ते कधीच या स्पर्धेतून बाद झालेत.