विल्यम्स भगिनींमध्ये रंगणार ड्रीम फायनल ?
विल्यम्स भगिनींनी विम्ब्ल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेना आणि व्हीनसनं सेमी फायनल गाठल्यानं आता विल्यम्स भगिनींमध्ये ड्रीम फायनल रंगण्याची शक्यता आहे.
लंडन : विल्यम्स भगिनींनी विम्ब्ल्डनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सेरेना आणि व्हीनसनं सेमी फायनल गाठल्यानं आता विल्यम्स भगिनींमध्ये ड्रीम फायनल रंगण्याची शक्यता आहे.
विम्बल्डनच्या ग्रास कोर्टवर अव्वल सीडेड सेरेना विल्यम्स आणि माजी वर्ल्ड नंबर वन व्हीनस विल्यम्स यांच्यात मेगा फायनल रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्या विल्यम्स भगिनी गेली दोन दशकं टेनिसच्या जगतात अधिराज्या गाजवतायत. त्यांच्यामधील बिग फाईटची पर्वणी जगभरातील टेनिस चाहत्यांना मिळू शकते.
व्हीनस सध्या टेनिस रँकिंगमध्ये नवव्या क्रमांकावर आहे. 36 व्या वर्षी ती थक्क करणारं टेनिस खेळतेय. प्लेअर्स मागून प्लेअर्सचा धुव्वा उडवत तिनं आपली आगेकूच कायम राखली आहे. क्वार्टर फायनलच्या लढतीत तिनं यारोसल्व्हा श्वेडोव्हाचा सरळ दोन सेट्समध्ये पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. 2010 नंतर पहिल्यांदा व्हीनसनं ग्रँडस्लॅमची सेमी फायनल गाठली आहे.
36 व्या वर्षी ग्रँडस्लॅम फायनल गाठीणारी ती बीली जीन रिंग आणि मार्टिना नवरातिलोव्हानंतर तिसरी टेनिसपटू ठरली. तर दुसरीकडे विमब्ल्डनच्या विजेतेपदाची प्रमुख दावेदार सेरेनानं रशियाच्या अनास्तेशिया पावलुचेनकोव्हावर मात करत सेमी फायनलचा प्रवेश निश्चित केला.
सेरेनाला स्टेफी ग्राफच्या 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदाशी बरोबरी करण्यासाठी केवळ एका ग्रँडस्लॅमची आवश्यकता आहे. मात्र, गेल्यावर्षी विम्बल्डन विजयानंतर ती एकही ग्रँडस्लॅम जिंकू शकलेली नाही. मात्र, आता तिला ती संधी आहे. विल्यम्स भगिनींनी आपापली मॅच जिंकली तर टेनिस चाहत्यांना ब-याच वर्षानंतर ऑल विल्यम्स फायनल बघण्याची नामी संधी मिळेल.