मुंबई : देशाचा अर्थसंकल्प हा निवडणुकीच्या तोंडावर नको. आम्ही राष्ट्रपतींना याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहोत. देशात ५ राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तसेच आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे अर्थसंकल्प जाहीर करणे चुकीचे आहे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, युती लाचारी करणार नाही, जनतेसोबत उभे राहू, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपला सुनावले. नोटाबंदीवरुन उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. राजा उदार झाला हाती भोपळा दिला, अशीच आज गत झाली आहे. घोषणांची केवळ भूल दिली जात आहे, असा चिमटा उद्धव ठाकरेंनी यावेळी काढला


पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात झाली का? मग कसले अर्ज भरून घेतात? आधी घर कुठे देणार ते दाखवा. आचारसंहितेच्या तोंडावर असं लोकांकडून अर्ज भरून घेणं देखील चुकीचे ठरवावे लागेल. शिवसेनेने विकासाला विरोध केलेला नाही. मुंबई मेट्रोत अनेकांची घरदार तुटणार होती म्हणून आवाज उठवला, असे सष्टीकरण उद्धव यांनी यावेळी दिले.


भाषणातील ठळक मुद्दे :


- दुष्काळ संपला पण आता तेरावा महिना सुरू झालाय !


- 'आम्ही एक दिवस महाराष्ट्र बंद केला तर दंड भरावा लागतो, आजपर्यंत जे नुकसान झालं त्याची भरपाई कोण देणार?'


- इंग्रजानीही विकास केला होता, मग त्यांना का देशातून हाकलवलं?


- निवडणूक लढवायची तर स्वच्छपणे लढवा, आमच्याकडे तेवढी लक्ष्मी नाही, जी आहे ती मत विकत घेण्यासाठी नाही !


- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा व्यवस्थित आराखडा मांडा, नियोजन करा !


- बुलेट ट्रेनला विरोध नाही, विकासाला शिवसेनेचा कधीच विरोध नव्हता !


- आमचा विकासाला विरोध नाही, विकास करताना आधी पुनर्वसन करा !



- पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या मेट्रो प्रकल्पाला स्थगिती देण्याची वेळ !


- शेतकऱ्यांची अवस्था बिकट, शेतकऱ्यांकडे खर्चासाठी पैसे नाहीत' !


- विजय मल्ल्या, ललित मोदी पळाले तेव्हा झोपा काढत होतात का?


- जिल्हा बँकेवरील बंदी का उठवली नाही ?..गैरव्यवहार केले मोठ्या बँकांनी, शिक्षा मात्र जिल्हा बँकांना !


- 'निवडणुका होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नका, शिवसेना राष्ट्रपतींकडे करणार मागणी' !


- राष्ट्रपतींना विनंती करणार, यांना भूलथापा मारण्यापासून रोखा, निवडणुकांवर डोळा ठेवून अर्थसंकल्प फेब्रुवारीत, हा अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी करणार


- हिंदुत्वाचा गळा दाबलात तर पेटून उठू !


- 'हिंदु धर्माचं रक्षण करण्याचा गुन्हा असेल तर तो आम्ही करणार' !


- ज्या योजना जाहिर केल्या त्या जुन्याच आहेत, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला !


- नोटाबंदीला जनतेचा पाठिंबा असल्याचं फक्त भासवलं जातंय !


- लोक जिवंत आहेत, हेच अच्छे दिन !


- 'लाल दिवा किती काळ टिकणार, जनतेशी नीट वागलात तर जनतेचं प्रेम जास्त काळ टिकेल' !


- नोटबंदीच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढी दहशत  !


- जे पटत नाही ते बोलणारच, मग कुणीही असो !