सातारा : सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजतोय. त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महिलांच्या सुरक्षेसाठी फलटणमध्ये एक थ्री स्टार हॉटेल उभारण्यात आलं. या हॉटेलमध्ये सगळं काही लेडीज स्पेशल आहे. याच हॉटेलसंदर्भातला एक रिपोर्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं हे हॉटेल. जॅक्सन इन. थ्री स्टार हॉटेल. हे हॉटेल वेगळं ठरले आहे. कारण महिलांचं, महिलांनी आणि महिलांसाठी चालवलेलं हे हॉटेल आहे. ब-याचवेळा कार्यालयीन कामासाठी किंवा पर्यटनासाठी महिला घराबाहेर पडतात. त्यांना लांबचा प्रवास करावा लागतो. अशा वेळी त्यांना सुरक्षित हॉटेल उपलब्ध व्हावं, हा या हॉटेलच्या स्थापनेचा मुख्य उद्देश असल्याचं व्यवस्थापकांचं म्हणणं आहे.


फलटण-लोणंद रस्त्यावरच्या औदयोगिक वसाहतीत सुरू करण्यात आलेलं हे हॉटेल महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं पहिलं फाईव्हस्टार हॉटेल ठरलंय... विशेष म्हणजे या हॉटेलमधले सुरक्षा अधिकारी, स्वागत कक्ष, वेटर, कुक असे सगळेच कर्मचारी महिला आहेत. 


या हॉटेलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष पुरवलं जातं. सीसीटीव्ही यंत्रणेची विशेष सोयही या हॉटेलमध्ये देण्यात आली आहे.  महिलांसाठी अल्प दरात सेवा देण्याचाही व्यवस्थापनाचा विचार आहे.  महिलांसाठी विशेष रुम्सची सोय करण्यात आलीय. ज्या महिला या हॉटेलमध्ये काम करतात त्यांच्या मुलांसाठी खास पाळणाघराचीदेखील सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात महिलांसाठी तयार करण्यात आलेलं हे पंचतारांकित हॉटेल सध्या अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.


खास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या जॅक्सन इन या पंचतारांकित हॉटेलला आता राज्यभरातून आणि देशभरातूनही महिला पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे.