नवी दिल्ली : भारतामध्ये तब्बल 103.5 कोटी नागरिक मोबाईल वापरत आहेत. ट्रायनं जून महिन्यापर्यंतची देशातली मोबाईल आणि लँडलाईन वापरणाऱ्यांची माहिती प्रसिद्ध केली आहे. जून महिन्यापर्यंत भारतात मोबाईल आणि लँडलाईन वापरणारे एकूण 105.98 कोटी नागरिक आहेत. मे 2016 मध्ये हीच संख्या 105.8 कोटी इतकी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रायनं दिलेल्या आकडेवारीनुसार देशात 83.20 टक्के फोन कनेक्शन आहेत. मे मध्ये हीच संख्या 83.14 टक्के होती. मे महिन्यामध्ये 103.3 कोटी असलेले मोबाईल ग्राहक जूनमध्ये 103.5 कोटी आहेत. 


मोबाईल वापरणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली असली तरी लँडलाईन ग्राहकांची संख्या मात्र कमी झाली आहे. मे मध्ये 2.48 कोटी असणारे लँडलाईन ग्राहक जूनमध्ये 2.47कोटी आहेत. 


मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर नजर टाकली तर एअरटेलच्या ग्राहकांमध्ये 14 लाखांची वाढ होऊन एकूण संख्या 25.57 कोटी झाली आहे. एअरटेलच या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीनुसार व्होडाफोनचे 19.94 कोटी तर आयडियाचे 17.62 कोटी ग्राहक आहेत. बीएसएनएलकडे एकूण 8.95 कोटी ग्राहक आहेत.