तिरंग्याच्या अपमानानंतर आता अॅमेझॉनवर गांधींचा फोटो असलेली चप्पल
अॅमेझॉनवर विक्री होत असलेल्या वस्तूंभोवतीचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.
मुंबई : अॅमेझॉनवर विक्री होत असलेल्या वस्तूंभोवतीचा वाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. भारताच्या तिरंग्याच्या पायपुसणं विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर आता अॅमेझॉनवर महात्मा गांधींचा फोटो असलेली चप्पल विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा नवा वाद निर्माण होणार आहे.
कॅफेप्रेसकडून Amazon.com या वेबसाईटवर 16.99 डॉलर म्हणजेच 1,190 रुपयांना ही चप्पल विकली जात आहे. याआधी भारताच्या तिरंग्याचं पायपुसणं विक्रीसाठी उपलब्ध केल्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चांगलीच तंबी दिली होती.
या प्रकरणात अॅमेझॉनने बिनाशर्त माफी मागावी, तसेच राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करणारे सर्व प्रॉडक्ट तात्काळ परत मागावा असा इशारा दिला होता. असे तात्काळ नाही केले तर अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना यापुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. यानंतर अॅमेझॉननं ही पायपुसणी हटवून माफीही मागितली होती.