मोबाईल अॅडिक्शनपासून दूर ठेवणार हे पाच अॅप
मुंबई : आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का?
मुंबई : आपल्या मोबाईलवर कायम काही ना काही करण्याची सवय तुम्हाला आहे का? अगदी काही कारण नसतानाही तुम्ही तुमचा फोन तपासत असता का? तर मग या सवयीवर नियंत्रण मिळवणं आवश्यक आहे. मोबाईलच्या अॅडिक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही काही अॅप्स तुमची मदत करू शकतात.
१. फॉरेस्ट
या अॅपमुळे तुम्ही तुमच्या फोनला विनाकारण हात लावणार नाही. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही एका झाडाचे ऑनलाईन वृक्षारोपण करता. तुम्ही तुमच्या फोनला अर्धा तास हात लावला नाही तर हे झाड वाढू लागते. जितका वेळ तुम्ही तुमचा फोन वापरत नाहीत तितक्या पटापट तुमचे झाड वाढू लागते.
२. चेकी
तुम्ही दिवसभरात किती वेळा तुमचा मोबाईल वापरता याची तुम्हाला कल्पनाही नसते. चेकी हे अॅप तुम्हाला ती माहिती अचूकपणे मिळवून देण्यास मदत करते. यामुळे आपण एका दिवसात किती वेळा आपला मोबाईल वापरला हे समजल्यास आपण तो कमी वापरण्याचा प्रयत्न करू शकतो.
३. प्रोडक्टिव्हिटी चॅलेंज टायमर
हे अॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्ही मोबाईलवर किती वेळ वाया घालवला याचे मूल्यमापन करते आणि त्या वेळात तुम्ही काय करू शकला असतात याची माहिती देते. त्यानंतर तुम्ही मोबाईल योग्य तऱ्हेने वापरण्याच्या बाबतीत पहिल्यापेक्षा चांगली प्रगती केली की नाही, याची माहिती सुद्धा हे अॅप देते.
४. फ्रीडम
मोबाईलच्या अतिवापरापासून हे अॅप तुम्हाला मुक्ती देऊ शकते. तुमच्या मोबाईलवर कोणते अॅप्स तुम्ही सर्वात जास्त वापरता याची एक यादी तुम्ही करू शकता. कोणत्या अॅप्समुळे तुमच्या कामावर जास्त परिणाम होतो त्या अॅप्सचा या यादीत समावेश करा.
५. अनप्लग
तुम्ही आयफोन वापरत असाल तर हे अॅप केवळ १२५ रुपयांत डाऊनलोड करू शकता. यामुळे तुमच्या फोनच्या वापरावर दररोज नजर ठेवता येते. यात तुम्ही रोजच्या वापराची मर्यादा ठरवू शकता. त्यापेक्षा कमी वापर केल्यास तुम्हाला काही पॉईंट्स बक्षीस म्हणून मिळतात.