गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचा मोह भारतीयांना आवरेना
गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय.
नवी दिल्ली : गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं जवळपास ९४ टक्के भारतीयांना धोकादायक आहे असं वाटतं... असं असलं तरी यातल्या जवळपास ४७ टक्के लोक स्वत: गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्याची कबुली दिलीय.
व्होडाफोन आणि सेव्ह लाइफ नावाच्या एनजीओद्वारे केल्या गेलेल्या सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आलीय. 'भारतात गाडी चालवताना मोबाईल फोनचा वापर, पॅटर्न आणि सवयी' याचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला.
जवळपास ४१ टक्के लोकांनी गाडी चालवताना आपण कामाच्या संबंधी फोनवर बोलतो आणि ऐकतो, असं म्हटलंय. 'व्होडाफोन'च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या अभ्यासात सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय.
या अभ्यासानुसार, जवळपास ३४ टक्के लोकांनी फोनवर बोलताना अचानक ब्रेक दाबावं लागल्याची गोष्टही कबूल केलीय. तर जवळपास २० टक्के लोकांनी फोन वर बोलता बोलता मोठ्या अपघातातून वाचल्याचं मान्य केलंय.
जयपूर, कोलकाता, चेन्नई, मंगळुरू, कानपूर, दिल्ली, मुंबई, बंगळुरू या आठ शहरांत हा अभ्यास करण्यात आला. टू व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर, ट्रक तसंच बस ड्रायव्हर यांच्यासहीत जवळपास १७४९ लोकांना यासंबंधी विविध प्रश्न विचारण्यात आले होते.
बंगळुरूमध्ये सर्वात जास्त म्हणजेच ८३ टक्के लोकांनी रस्त्यावर गाडी चालवताना फोनवर बोलत असल्याचं म्हटलंय. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो तो कोलकता (७० टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई (६५ टक्के) तर दिल्लीमध्ये अशा लोकांची संख्या जवळपास ४७ टक्के आहे.
महत्त्वाचं म्हणजे, ६८ टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या चालकांना कॅमेऱ्याच्या मदतीनं पकडून त्यांना दंड करायला हवा.